फटाके न वाजवता वाचलेला पॉकेट मनी करणार पूरग्रस्तांना दान
दिवाळीमध्ये फटाके वाजवताना दिसणारा प्रकाश आणि जाणवणारा आवाज न अनुभवता दिवाळीनिमित्त लावण्यात येणाऱ्या दिव्याच्या ज्योतींचा लखलखता प्रकाश अनुभवण्यासाठी अभिनवच्या एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली.आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे सलग 17 वर्षे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी जनजागृती करून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत.
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक राजीव जगताप म्हणाले कि,फटाके वाजवल्यामुळे दिवाळीमध्ये सर्वात जास्त प्रदूषण होते,त्यामुळे गंभीर आजारांना निमंत्रण मिळते .अशा विघातक दुष्परिणामांमुळे सर्व विद्यार्थ्यांनी दक्ष राहिले पाहिजे.नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेतली पाहिजे.दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याची संकल्पना समाजामध्ये रुजवली तर एक दिवस खरोखरच फटाकेमुक्त दिवाळी साजरी होईल . फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी अनुभव व्यक्त करताना सिद्धी शिंदे,अनुष्का शिंदे, कार्तिकी घुले, गायत्री मराठे, क्षितिज गायकवाड म्हणाले की “फटाके जाळणे म्हणजे पैशाची राख,धूर आणि प्रदूषण करणे होय, त्यापेक्षा फटाके न वाजवता वाचवलेले पैसे आम्ही गेली 17 वर्षे गरजू व्यक्तीला ,अनाथ आश्रमातील किंवा वृद्धाश्रमातील व्यक्तीला दान म्हणून देत होतो परंतु या वर्षी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्यासारखी होईल,” त्याचबरोबर शिल्लक राहिलेला दिवाळीचा फराळ वाया न घालवता पूरग्रसतांना देण्या संबंधी आवाहनही केले.
कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे आणि वैशाली बारटक्के यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची उपस्थितांना शपथ दिली.आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.या सामाजिक उपक्रमाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप ,सेक्रेटरी सुनीता जगताप ,सहसेक्रेटरी निर्मोही जगताप, समन्वयक डॉ. सविता शिंदे, प्राचार्या वर्षा शर्मा यांनी कौतुक केले.